मुंबई : रेडिओ कुठल्याही शहरात घेतलं तरी दुसऱ्या शहरात गेल्यावर त्याचे स्टेशन बदलते. त्याचप्रमाणे नेत्यांचे असते. आमच्या पक्षात आल्यावर त्यांच्या विचारात राष्ट्रवाद, देशभक्तीची भावना जन्माला येते, यामुळे माणसं बदलतात, असे मत वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
इतर पक्षातील अनेक नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. राष्ट्रवादीचा काही गट भाजपाकडे येणार आहे का या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की, येऊ द्या चांगली गोष्ट आहे. देशभक्ती से जो खून ना खोले खून नही वो पानी है, ट्रांझिस्टरची भाषा आपोआप बदलते, त्यामुळं चिंता करू नका. जो जो म्हणून विकास आणि प्रगतीसाठी अतिशय प्रामाणिक भूमिकेने सहकार्य करण्याचा विचार करेल त्याच स्वागत आहे.
मुनगंटीवार म्हणाले, चांगल्या कामासाठी जर लोक आपल्यासोबत येत असेल तर असे लोक सोबत घेतले पाहिजे. येताना फक्त एवढी काळजी घेतली पाहिजे की, अतिशय गंभीर पद्धतीचे आरोप सिद्ध झालेले आहेत, अशा लोकांना पक्षात घेऊ नये. ही माझी व्यक्तिगत आग्रही मागणी आहे.
या पक्षातील नेते त्या पक्षात गेल्यावर कसे बदलतात या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी रेडिओचे उदाहरण दिले. सोलापूरमध्ये रेडिओ विकत घेतला तर सोलापूर आकाशवाणीचा आवाज येईल, मुंबईत आला तर मुंबईचा आवाज येईल. तुमच्या पक्षात असताना त्यांचा जो विचार आहे तो आमच्या पक्षात आल्यावर त्या विचारात राष्ट्रवाद देशभक्तीची भावना जन्माला येते, यामुळे माणसं बदलतात, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
संजय राठोड तुमच्या पक्षात होते तेव्हा त्यांना क्लीन चिट दिली होती. ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यावर यांच्याकडे म्हणायचे आता तुम्ही त्यांना कसे घेता? तुम्ही क्लीनचिट दिली, तुमचा तुमच्यावर ही विश्वास नाहीये का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. म्हणजे तुम्हीच लोकांना सांगताय का की मी एक खोटारडा माणूस आहे आणि सर्वांना क्लिन चिट देत फिरतोय, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
