छत्रपती संभाजीनगर बाजार समिती भाजप-शिवसेनेच्या ताब्यात, महाविकास आघाडीला धक्का

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठं धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 11 जागा भाजप-शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर उरलेल्या तीन जागांवर इतर अपक्ष यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतमोजणी होत आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक मोठी बाजार समिती समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले.