कांदा अनुदानसाठी आतापर्यंत ३६ हजार ७४० शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीकडे अर्ज केला आहे. २० एप्रिल रोजी पणन विभागाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती, या ८ दिवसात फक्त १६०० अर्जांची भर पडली आहे. अर्ज करण्यासाठी रविवार शेवटचा दिवस असून सायंकाळी ६ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती कांदा विभागप्रमुख विनोद पाटील यांनी दिली.
कांद्याचे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांना राज्य सरकारने २०२२ – २०२३ या वर्षात विक्री केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केले आहे. प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. राज्य शासनाच्या वतीने शेतकर्यांना देण्यात येणार्या कांदा अनुदान योजनेची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र शेतकर्यांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहानस राज्याचे पणन संचालक विनायक कोकरे यांनी केले आहे.
बाजार समितीकडील सर्व अर्ज समितीकडे देण्यात येतील. तपासणी करून त्यातील पात्र व अपात्र शेतकरी ठरवले जातील. त्यानंतर पात्र शेतकरी व आवश्यक अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे सचिव सी.ए. बिराजदार यांनी सांगितले.
