उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडण्यास शरद पवारच जबाबदार; नरेंद्र पाटलांचा आरोप

भारतीय जनता पक्षापासून उद्धव ठाकरेंना दूर करण्याचं काम शरद पवार यांनी केलं, तसेच उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडण्यास शरद पवार जबाबदार असल्याची टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख हे साताबाऱ्यावरील मराठा मुख्यमंत्री होते. कट्टर मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून, तेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचं ‍श्री. पाटील यांनी सांगितलं.

श्री. पाटील म्हणाले, ‘अजित पवार भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १६ आमदारांच्या बाजूने लागणार असून, जसा कालावधी पुढे जाईल तसे सरकार घट्ट होत आहे. दरम्यान, सारथी योजनेतून डेथ ऑफ रजिस्ट्रेशन करण्याची विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, आता विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार आहे.’

मराठा विद्यार्थ्यांना वसतिगृह बांधण्यासाठी शासकीय जागांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. येत्या वर्षभरात वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. सारथी योजना गावागावांत लोकांपर्यंत पोचण्यासाठी योजनेत बदल केले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दोन लाखांपर्यंत कर्ज महामंडळातून दिलं जाण्याची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकांशी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.