पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा शंभरावा भाग आहे. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं होतं.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. याआधीचा एपिसोड 26 फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. ज्याचं प्रसारण डीडी नेटवर्कवरही केलं जातं. फक्त 30 मिनिटांचा हा कार्यक्रम. आज 30 एप्रिल रोजी याचे 100 एपिसोड पूर्ण होणार आहे. त्याआधी पीएम मोदींच्या या मन की बातचा देशावर नक्की काय परिणाम झाला, याचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे आभार मानले. पंतप्रधान म्हणाले, तुम्ही पाठवलेली पत्रं वाचून मी भावूक झालो. माझ्यासाठी हा कार्यक्रम आता एक पर्व बनलं आहे. या कार्यक्रमाने मला तुमच्यासोबत जोडून ठेवलं आहे. या कार्यक्रमामुळे मी तुमचे विचार समजू शकलो. मन की बात आता माझ्यासाठी कार्यक्रम नसून पूजा आहे.
मन की बातच्या माध्यमातून जनआंदोलन सुरू झालं. ‘मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनला. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचं मिशन मन की बातनंच सुरू झालं. आपले भारतीय श्वान म्हणजेच, देशी श्वानांबाबत जागरुकता निर्माण करण्याची सुरुवातही मन की बातने झाली. यासोबतच गरीब आणि लहान दुकानदारांशी भांडण न करण्याची मोहिम सुरू करण्यात आली होती. अशाप्रकारे प्रत्येक समाजात परिवर्तनाचं कारण मन की बात बनली.
