अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर, राष्ट्रवादीचा अजिबात पाठिंबा नाही, शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन

मुंबई : अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही, असे शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाची सध्या चर्चा आहे. राज्यात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधी बाबत शरद पवार यांनी त्यामध्ये सविस्तर लिहिला आहे. अजित पवार यांच्या बंडाची बातमी मिळाल्यावर त्यांनी पहिला फोन उद्धव ठाकरे यांना केला. त्यावेळी अजितने उचललेले पाऊल अत्यंत गैर आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते.

राज्यातील सत्तांतरावर आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेबाबत शरद पवार लिहितात, किमान समान कार्यक्रमावरही एकमत झालं होतं. बारीकसारीक तपशील निश्चित ठरवण्याचे काम सुरू होतंच. मंत्रिमंडळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला माप, तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद देण्याचंही नक्की झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, असंही एकमतानं जाहीर झालं. राज्यात ‘महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी सर्व बाबींची पूर्तता झाली होती. राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या. सरकारस्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आले.
पहाटेच्या शपथविधीबाबत ते म्हणतात, २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,’ अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता. ‘महाविकास आघाडी’चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकीच एक दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं.

‘महाविकास आघाडी’चा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. ‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,’ असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं.