नागपूर : निवडणुका योग्य वेळी होतील आणि त्यावेळी आम्ही यांना चारी मुंड्या चित करू, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. महाविकास आघाडीच्या कालच्या सभेत निवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान ठाकरेंनी दिले होते. यावर फडणवीस म्हणाले, निवडणुका योग्य वेळी आम्ही घेणारच आहोत आणि तुम्हाला पाडणारच आहोत. निवडणुका घेऊन दाखवा घेऊन दाखवा म्हणजे काय रोज होतात का?
भगवा उंच रोवायचा आहे या महाविकास आघाडीच्या दाव्याची खिल्ली उडवताना उपमुख्यमंत्री म्हणाले, माझे यामुळे मनोरंजन होत आहे. याचे कारण म्हणजे जे लोक आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागले आहेत त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावे हे देखील एक आश्चर्यच आहे. पण मी त्या संदर्भात काही बोलणार नाही. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला विचारा.
महाविकास आघाडीच्या सभेवर टीका करताना फडणवीस म्हणाले कालची सभा म्हणजे निराश लोकांचे रण्यरूदन आहे. त्यांची सत्ता गेल्यामुळे ते निराशही आहेत, बावचळलेलेही आहेत, तोल गेलेलेही आहेत. त्यामुळे अशा लोकांनी काही बोलल्यावर ती गोष्ट किती सिरीयसली घ्यावी याचा विचार आपणही केला पाहिजे. त्यांना केवळ टीका करायची आहे. ते अडीच वर्षे सत्तेत असताना एकही विकासाचे काम करू शकले नाहीत. आम्हाला विकास करायचा आहे.
आम्ही लोकांमध्ये जात आहोत. समस्या सोडवत आहोत. यूपीएच्या समान किमान कार्यक्रमात एक रुपयात क्लिनिक असे त्यांनी म्हटले होते. परंतु अडीच वर्षात एकही क्लिनिक सुरू करू शकले नाहीत. आम्ही काल साडेतीनशे आपला दवाखाना सुरू केले. त्यामुळे हे बोलणारे लोक आहेत. तोंडाची वाफ दवडणारे लोक आहेत. केवळ टीका करणारे लोक आहेत. जनतेच्या प्रति यांना काही देणे घेणे नाही.
