मणिपूरमध्ये हिंसाचाराचा भडका; भाजप आमदारावर जीवघेणा हल्ला

मणिपूरमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून मैती आणि अन्य आदिवासी समुदायांमध्ये संघर्षाचा भडका उडाला आहे. केंद्र सरकारनं परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहे. मात्र, त्यानंतरही हिंसाचार सुरूच असून भारतीय जनता पक्षाचे आमदार वुंगजागिन वाल्टे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. वाल्टे यांच्यावर जमावानं हल्ला केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे

केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून ईशान्येत तुलनेनं शांतता आहे. सध्याच्या हिंसाचारामुळं केंद्र सरकार सतर्क झालं असून गृहमंत्री अमित शाहा यांनी तातडीने बैठक बोलावली. त्यांनी मणिपूरच्या शेजारच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी राज्य आणि केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. शहा यांनी नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ, मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती घेतली.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांची भेट घेऊन सचिवालयातून परतत असताना वाल्टे यांच्यावर इम्फाळमध्ये जमावानं हल्ला केला. फिरजवल जिल्ह्यातील थानलॉन येथून तीन वेळा आमदार राहिलेले वाल्टे हे इम्फाळ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
संतप्त जमावानं वाल्टे आणि त्यांच्या चालकावर हल्ला केला, तर त्यांचा पीएसओ पळून जाण्यात यशस्वी झाला. आमदाराची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर इम्फाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथं उपचार सुरू आहेत. वाल्टे हे कुकी समाजातील आहेत. मागील भाजप सरकारमध्ये ते मणिपूरचे आदिवासी व्यवहार आणि पहाडी मंत्री होते.

मणिपूरमधील हिंसाचारामुळं ९ हजारहून अधिक लोक बेघर झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ५५ ​​तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती लष्करानं दिली आहे. संपूर्ण परिसरात इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा बंद करण्यात आली आहे.