जोशीमठजवळ कोसळली मोठी दरड, बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो पर्यटक अडकले

उत्तराखंडमधील जोशीमठ हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून नेहमी चर्चेत येत असतं ते तेथील दुर्घटनांमुळे. या ठिकाणी गुरूवारी पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. सध्या चार धाम यात्रा सुरू आहे. त्यामुळे घटनेनंतर पर्यटक आणि स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंर बद्रीनाथ माहमार्ग बंद करण्यात आला आहे. तर हजारो पर्यटक या भागात अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे.

बद्रीनाथ महामार्गावरील हेलांग येथील डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. यानंतर प्रशासनानं बद्रीनाथ यात्रा थांबवली आहे. महामार्गावर कोसळलेल्या दरडेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगावर शहारे आणणारा भयावह व्हिडीओ आहे. पोलिसांनी गौचर कर्णप्रयाग आणि लंगासूमध्ये बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितलं आहे.

दरड कोसळल्यानंतर चारधाम यात्रा थांबविण्यात आली आहे. महामार्गावरून येणाऱ्या यात्रेकरूंना अडवण्यात आलं. प्रवासी मार्गात अडकून पडले आहेत. ढिगाऱ्याखाली सापडल्याने कारमधून प्रवास करणारे चंदीगड येथील दोन प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्याचवेळी हनुमान चाटी येथे डोंगरावरून दगड पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.