राहुल गांधींच्या ‘मोहब्बतच्या दुकाना’त हिंदूंना स्थान नाही – नितेश राणे

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी (31 मे) कॅलिफोर्नियामध्ये भारतीयांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काही लोकांनी खलिस्तानी झेंडे फडकावत खलिस्तानच्या मागणीबाबत घोषणाबाजी केली. या प्रकरणी भाजपा नेते नितेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदमध्ये बोलताना नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये हिंदु मंदिरांसमोर हिरवे झेंडे फडकवून डिजे लावला जातो. काँग्रेसने एक मोहब्बतचे दुकान कर्नाटकमध्ये उघडले आहे.राहुल गांधी अमेरिकेला गेल्यानंतर खलिस्तान जिंदाबादचे नारे काल ऐकायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींजी गेल्यानंतर जगामध्ये एक वेगळा अभिमान पाहायला मिळतो. मग तिकडचे भारतीय असो किंवा त्या-त्या देशाचे स्थानिक नागिरक असो, ते मोदींना सन्मान देतात. मात्र काल राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये आपलं राष्ट्रगीत सुरु असताना समोरचे लोकं उभे पण राहिले नाहीत. राहुल गांधी बोलतात ‘में मोहब्बत की दुकान यहा खोलने आया हू.’ मात्र राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानात हिंदूंना स्थान नाही, अशी टीका नितेश राणे केली आहे.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘केंद्राच्या २०१४ ते २०२३ हा देशाचा सुवर्णकाळ होता. मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू ठेवली. प्रगतीच्या दिशेने निर्णय घेतले गेले. गरीब कल्याणच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची वेगळी ओळख जगभरात निर्माण झाली. यापूर्वीचे सरकार भ्रष्टाचाराने भरबटलेले होते. त्यामुळे देशाची भ्रष्ट देशांमध्ये नोंद होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे १४० कोटी जनतेने मोदी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता दिली.

या सत्तेच्या काळात प्रत्येक घटकाला मोदींनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सन्मान योजना, मच्छीमारांसाठीही वेगवेगळ्या योजना, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. कोकण रेल्वेचाही विकास होत आहे. पंतप्रधान आवास योजना देशभरातील लाभार्थींना हक्काचे घर मिळाले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचत आहे.असेही राणे म्हणाले.