कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेत 233 जणांचा मृत्यू, 900 हून अधिक प्रवासी जखमी

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला. या भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. 300 च्या आसपास लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातात आतापर्यंत 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असंही रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलं आहे. हावडा मेलची ही टक्कर या दरम्यान झाली. एनडीआरएफ आणि लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.आज सकाळपर्यंत मदत यंत्रणांचे बचावकार्य सुरू असून, त्यामध्ये रेल्वेच्या बोगीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी 7.20 वाजता ही घटना घडली. बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली. याशिवाय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.