आता काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रिपदावर दावा? नागपुरात झळकले नाना पटोलेंचे बॅनर; भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शहरात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. नागपुरच्या अजनी भागात असे पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचे देखील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर ठाकरे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नागपुरात लावण्यात आले होते. या पोस्टरवरून शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात भावी मुख्यमंत्री कोण असणार यावरही चर्चा होत आहे. मुख्यमंत्री पदाच्या या चर्चेत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव देखील दाखल झालं आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर लिहिलेले पोस्टर्स समोर आले आहेत. उद्या (5 जून) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस असून नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना परिसरात हे बॅनर लावले आहेत. दक्षिण नागपूर शहरात अनेक ठिकाणी नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर नाना पटोलेंचे हे पोस्टर्स व्हायरल होत आहेत. अशात यावर पटोलेंनी स्वत: आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॅनरविषयी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेल्या पोस्टरविषयी मला समजलं, मात्र अशा प्रकारचे पोस्टर्स कोणीही लावू नयेत. माझा हा वाढदिवस मला सामाजिक कार्य करत साजरा करायचा आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थ्यांना हवं तसं शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत मी हा वाढदिवस साजरा करणार आहे.

याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर विविध ठिकाणी लावण्यात आले होते. यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होऊ लागल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरू असताना काँगेस, राष्ट्रवादी आणि आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत. या बॅनर्समुळे राजकीय गोटात विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.