ओडिशामध्ये झालेल्या भीषण अपघाताचं कारण समोर आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशाच्या बालासोरमध्ये एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 288 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे घडल्याचं समोर आलं आहे. या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्यावर भर असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. तसेच याला जबाबदार असलेल्या लोकांचीही ओळख पटली असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांनी हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला.पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सूचनांनूसार काम वेगाने सुरू आहे. काल रात्री ट्रॅकचे काम जवळजवळ पूर्ण झाले. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व डब्बे काढण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत सामान्य मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय वायू सेनेने स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभागाच्या सहय्याने मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी एमआय-१७ हेलिकॉप्टर तैनात केलं आहे. रेल्वेरूळ, सिग्नल यंत्रणा तसेच इतर दुरुस्तीच्या कामासाठी १,००० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. तसेच सातपेक्षा जास्त पोकलेन मशीन, अपघातात मदत करणारी दोन वाहनं तीन ते चार रेल्वे गाड्या आणि रोड क्रेन तैनात करण्यात आले आहेत.
