अजित पवार यांच्याबद्दल मी काल जे काही बोललो आहे, त्याचा मला खेद वाटतो. मी असे बोलणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात शाद्बीक चकमक पाहायला मिळत आहे. राऊतांच्या या यु टर्नवर आता अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
“मला अजित पवारांविषयी अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारला गेला. अजित पवारांनी तुमच्याविषयी असं असं बोलले, ते असं बोलले नाहीत. माझा आणि अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असल्याने आम्ही पटकन बोलून जातो. अजित पवार म्हणाले होते की महाराष्ट्रात संयमाने वागलं पाहिजे. त्यांचं म्हणणं योग्य आहे मी सहमत आहे. अजित पवार असंही म्हणाले की थुंकण्यासंदर्भात संजय राऊत यांनी खुलासा दिला. मात्र मला वेगळा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिलं. मला त्याचा खेद वाटतो आहे.” असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझा आणि अजित पवार यांचा स्वभाव थोडा तापट असल्याने आम्ही दोघे पटकन व्यक्त होतो. अजित पवार यांच्याबद्दल मी जे बोललो त्याचा मला खेद आहे. आता यापुढे संपूर्ण भूमिका ऐकल्याशिवाय मी त्या विषयावर बोलणार नाही, असे मी ठरवले आहे. अजित पवार मविआतील अतिशय महत्वाचे नेते आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावर राऊत म्हणाले, नाना पटोले यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावले जातात. समर्थकांचा अतिउत्साह असे म्हणावे लागेल. त्यांना कुणीही सांगत नाही की अशी बॅनरबाजी करा.
