सोशल मीडियावर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून कोल्हापूर शहरात तणावाचं वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरातील परिस्थितीवरून संताप व्यक्त केला आहे. तसेच सरकारने दोषींवर चार्जशीट दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
संभाजीराजेंनी ट्वीट करत सरकारकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. “शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे.सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे”असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
काल कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं समर्थन करणारी पोस्ट स्टेटसवर ठेवल्याचा प्रकार घडला. औरंगजेबाचं समर्थन करणारी पोस्टबद्दल समजताच काही हिंदुत्ववादी तरुणांनी हातात भगवे झेंडे घेत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देत लक्ष्मीपुरा पोलिस ठाण्यासमोर एकच गर्दी केली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापुर बंदची हाक देण्यात आली होती.त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. शहरातील बिंदू चौकासह अंबाबाई मंदिर, महाद्वार मार्ग परिसरात असंख्य तरुण रस्त्यावर उतरले होते.
