सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद आहेत. तर संबंधित तरुणांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे शिवाजी चौक परिसराला लागून असलेल्या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
एकाएकी जमाव प्रक्षुब्ध होत नाही. औरंगजेबाचे फोटो डोक्यावर घेऊन काही लोकांनी संभाजीनगर येथे मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे. क्रुरकर्मा औरंगजेबाने 40 दिवस अतोनात छळ करत संभाजी महाराजांचा वध केला. अशा औरंगाजेबाचा फोटो डोक्यावर घेऊन कोणी नाचत असेल तर जमाव प्रक्षुब्ध होतो, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
आज मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोस्ट करणारे, फोटो डोक्यावर घेऊन नाचणारे आणि त्यांच्या मागे जे कोणी आहेत त्यांची सायबर सेलमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करणार आहे. गुप्तचर खात्याकडून चौकशी झाली पाहिजे याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हे करणारे कोण आहेत? डोक्यावर फोटो घेऊन नाचवणारे पडद्यामागे कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे.वेळप्रसंगी राज्याच्या गुप्तचर खात्याकडून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
राज्यात विकास कामांना खीळ बसवण्यासाठी गेले 11 महिने महाराष्ट्रात शांततेचे वातावरण आहे. विकासाची कामे सुरु आहेत.याला खिळ बसवण्यासाठी, गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातकोणी करतंय का याच्या खोलावर जाणं आवश्यक असल्याचे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले.
कोल्हापूरातील परिस्थितीबाबत बोलताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पडद्यामागे जे कोणी असतील त्यांची सखोल चौकशी केली जाईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. तसेच कोल्हापुरात हिंसाचार सुरु झाल्यानंतर दोन ते तीन वेळा मी कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखांशी बोललो. जमावाला शांततेच्या मार्गाने पांगवण्याचं आमचं पहिलं प्राधान्य आहे. काही प्रमाणात जमावाकडून गाड्यांची तोडफोड झाली. त्यामुळे जमावाला सौम्य पद्धतीने पांगवण्याचं काम पोलिसांकडून झालं, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
