कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घातलं जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोशल मीडियावर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे. याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदी हाक दिली होती. त्यानंतर आज मोठ्या सख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. या पार्श्वभूमिवर सध्या शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.कोल्हापुरात तणाव निर्माण झालेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम गृहविभागाचं आहे. मी अधिकाऱ्यांशी स्वत: बोलत आहेत. ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नका. कायदा हातात घेणाऱ्याला पाठी घालणार नाही. कारवाई केली जाईल. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबादीर जशी सरकारची आहे, तशीच सहकार्य करण्याची जबाबदारी लोकांची आहे. सर्वांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावं. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाचं सहकार्य गरजेचं आहे. जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी मी स्वत: वैयक्तिक बोलत आहे. सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन करतो. मी अधिकाऱ्यांशी बोललो, तेव्हा सांगितलं की परिस्थिती नियंत्रणात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घातलं जाणार नाही. मी स्वत: अधिकऱ्यांच्या संपर्कात आहे’.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोल्हापुरातील परिस्थितीवर भाष्य केलं. ‘देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ औरंगजेबाची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच. पोलिस सुद्धा कारवाई करतच आहे. त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे’. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत. कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोल्हापुरात अफवा पसरू नये, यासाठी इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे.