राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्थांचा समावेश

भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी जाहीर केला. शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट 850 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय संस्थात्मक रॅकिंगमध्ये महाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

संस्थात्मक रँकिंगच्या यादीत देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था,मुंबई 30 व्या स्थानावर आहे. पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन या संस्थेस 34 वे स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (35), रासायनिक तंत्रज्ञान संस्था-मुंबई(41), सिम्बायोसिस इंटरनॅशनल – पुणे (59), डॉ.दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था- वर्धा (75), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठ – पुणे (81), विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- नागपूर (82), नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (88), मुंबई विद्यापीठ – मुंबई (96)

देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. होमी भाभा राष्ट्रीय संस्था- मुंबई हे विद्यापीठ रँकिंगमध्ये 17 व्या स्थानावर आहे. पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठास 19 वे स्थान मिळाले आहे, तर रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई ला 23 वी रँकिंग देण्यात आली आहे. सिम्बायोसिस इंटरनॅशनल –पुणे (32), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था –वर्धा (39), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठातील–पुणे (46), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (47), मुंबई विद्यापीठ –मुंबई (56), भारती विद्यापीठ – पुणे (91), आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस 98 व्या क्रमांकावर आहे.

संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील 50 संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे 4 व्या स्थानावर आहे . तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई 10 व्या स्थानावर असून होमी भाभा राष्ट्रीय संस्था – मुंबई 15 व्या , भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे 27व्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- मुंबई 37 व्या स्थानावर आहे.