अचानक ‘औरंग्याच्या’ इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरणाच्या घटना या कनेक्शनची चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यानंतर आज मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते.

या ठिकाणी कधीही औरंगजेबाचा उदात्तीकरण होऊ शकणार नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पण, हे जे नवे कोण आहेत हे शोधून काढावे लागेल आणि आम्ही ते शोधून काढू, मात्र महाराष्ट्र कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच. पण, त्यासोबत महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे. त्याच्यावरही त्याच्यामुळे कुठेतरी डाग लागतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.