मीरा रोड परिसरात एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. मरिन ड्राईव्हला विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्यानंतर मीरा रोडची घटना उजेडात आली. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यात आले. मीरा रोड हत्याकांडावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं.
चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टॅग करून टीका करणारं ट्वीट केलं आहे. सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल. किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो सुप्रिया सुळे. तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं.
“तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्षं सापडली नाही. तेव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं. श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही ३५ तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच”, असंही वाघ यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
दरम्यान, आरोपीला शिक्षा होईल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला आहे. “मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही, मोठ्ठ्या ताई…”, असं आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
