‘कमवा आणि शिका’ योजनेच्या अंलमबजावणीसाठी लवकरच नवे धोरण – चंद्रकांत पाटील

यशस्वी स्किल्स सोबत इतरही संस्थांना ‘कमवा आणि शिका योजना’ राबविता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल आणि त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव या योजनेला देण्याचा मानस आहे. यशस्वीने या योजनेचे आदर्श मॉडेल तयार करावे आणि उद्योगांनी योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हॉटेल जेडब्ल्यु मेरिएट येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लि. तर्फे आयोजित ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार राजेश टोपे, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, यशस्वी ग्रुपचे चेअरमन विश्वेश कुलकर्णी, प्रतापराव पवार, राजेश पांडे, टाटा मोटर्सचे व्यवस्थापन सल्लागार गजेंद्र चंदेल आदी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण आणि कौशल्य शिक्षणावर भर या धोरणाचा गाभा आहे. मातृभाषेतून शिक्षण हा त्यातील तेवढाच महत्वाचा भाग आहे. विषयाची समज येण्यासाठी आणि संशोधनाच्यादृष्टीनेही मातृभाषेतील शिक्षणाला महत्व आहे. देशात पाश्चात्य देशांच्या तुलनेत संशोधनाचे प्रमाण कमी असून ते वाढविण्याची गरज आहे. म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाला गती देण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाटील म्हणाले. शासनाने कौशल्य विकास विद्यापीठ स्थापनेचा निर्णय घेतला. या विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. तसेच राज्यातील शिक्षण संस्थांनी कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी राज्यपातळीवर सुरू करण्यात आली आहे. ‘कमवा आणि शिका’ योजना सुरूवातीच्या काळात ५ अभ्यासक्रमासाठी सुरू केली होती. त्यात वाढ करून १९ अभ्यासक्रमांनी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर म्हणाले. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या धोरणानुसार याचा अभ्यासक्रम निर्धारीत करण्यात येणार आहे. शिकत असतानाच उद्योगांना अपेक्षित अभ्यासक्रमाची पदविका विद्यार्थ्यांना मिळविता येणार आहे. उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आणखी अभ्यासक्रमाची भर घालण्याची शासनाची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी आणि उद्योग अशा दोघांनी या योजनेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगांनी या विद्यार्थ्यांची नीट काळजी घेऊन त्यांच्या प्रगतीला हातभार लावावा. या योजनेबाबत जागरुकता आणण्याचा प्रयत्न करावा. या योजनेच्या माध्यमातून चांगले व्यक्तिमत्व तयार होतील, असेही ते म्हणाले.