सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी – काँग्रेससोबत जाऊन बसले – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतानाच उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. अमित शाह यांनी मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडतानाच विशेष करून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जोरदार लक्ष्य केले. शाह यांनी आपल्याला पंतप्रधान म्हणून मोदी हवेत की राहुल? अशी विचारणा जाहीर सभेत केली. अमित शाह म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्राला एक नंबरमध्ये आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठं कार्य केलं आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. त्यात त्यांनी ‘शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे तर अमित शाह यांनीच फोडली’ या खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. “उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने शिवसैनिकांची मने दुखावली. त्यामुळेच हे बंड घडले. उलट ठाकरेंनी मोदींच्या नेतृत्वाखाली २०१९ ची निवडणूक जिंकली व मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेससोबत जाऊन बसले,’ असा हल्लाबोल शाह यांनी केला.

आपल्या भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर समाचार घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीस नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने देशपातळीवर सुरू केलेल्या महाजनसंपर्क अभियानात अमित शहा यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नांदेड नगरीतील गुरूद्वारालगतच्या अबचलनगर पटांगणात झाली. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी तत्कालीन हैदराबाद संस्थान आणि मराठवाडय़ाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उल्लेख करून तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वातंत्र्यलढय़ाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केले.

गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे की, “मी उद्धव ठाकरेंना विचारतो की कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारला इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकर मिटवायचे आहेत. तुम्ही याच्याशी सहमत आहात का?” मी नांदेडच्या जनतेला विचारतो की महान देशभक्त, त्याग पुरूष वीर सावरकर यांचा सन्मान करायचा की नाही? उद्धवजी, तुम्ही दोन बोटीत पाय ठेवू शकत नाही… उद्धवजी म्हणतात की आम्ही त्यांचे सरकार पाडले. त्यांचे सरकार आम्ही पाडले नाही. तुमच्या दुटप्पी भूमिकेला कंटाळून शिवसैनिकांनी तुमचा पक्ष सोडला आहे, असेही ते म्हणाले.