छत्रपती संभाजीनगर-मुंबई प्रवास पुन्हा शक्य; 1 जुलैपासून विमानसेवा सुरू

तब्बल 97 दिवसांनंतर अखेर 1 जुलैपासून इंडिगोकडून पुन्हा एकदा सायंकाळच्या वेळेत मुंबई-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची मुंबई विमान प्रवासासाठी होणारी गैरसोय संपणार आहे. सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी पुन्हा शहरात परतणे शक्य होणार आहे.

शहरातून मुंबईसाठी येथे 1 जुलैपासून सायंकाळचे विमान सुरू करण्याची घोषणा इंडिगो एअरलाइन्सने केली आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. यामुळे आता मुंबईसाठी सायंकाळी देखील विमान उपलब्ध होणार आहे. मुंबईसाठीचे सायंकाळचे विमान इंडिगो पुणे रद्द केल्यानंतर प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. सकाळी मुंबईला गेल्यावर परत दुसऱ्या दिवशी यावे लागत होते. मात्र आता सायंकाळी इंडिगो पुणे विमान सुरू केल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. मुंबईहून सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी विमान निघून चिकलठाणा विमानतळावर 7 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल, तर परत हे विमान चिकलठाणाहून रात्री 7 वाजून 50 मिनिटांनी निघून रात्री 9 वाजता मुंबईला पोहोचेल.

आजघडीला मुंबईसाठी एअर इंडिया आणि इंडिगोकडून सकाळच्या वेळेतच विमानसेवा आहे. त्यामुळे सकाळीच विमानतळावर जावे लागते. परंतु आता १ जुलैपासून सकाळच्या वेळेतील दोन विमानांबरोबर सायंकाळीही मुंबईसाठी विमान उपलब्ध राहणार आहे.औरंगाबाद फाउंडेशन डेव्हलपमेंटचे सुनीत कोठारी यांनी कोविडकाळात बंद केलेल्या सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सप्टेंबरमध्ये अहमदाबाद तर नोव्हेंबरमध्ये उदयपूरसाठी येथून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.