बँकांचे सर्वाधिक कर्ज बुडवणारे ग्राहक श्रीमंत गटातील – नितीन गडकरी

विविध बँकांचे कर्ज बुडवणारे सर्वाधिक ग्राहक हे श्रीमंत गटातील असतात, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. रोजगार मेळावा अंतर्गत आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. ज्या गरीब लोकांना ई-रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले, त्या सर्वांनी १०० टक्के लोकांनी कर्जाची परतफेड केली आहे असे देखील ते म्हणाले आहेत.

गडकरी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्थानापन्न झाल्यापासून मुद्रा लोन, स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराच्याही अनेक संधी मिळाल्या आहे. बँकांचे निरीक्षण केल्यास गरीब ग्राहक नियमित कर्ज भरताना दिसतात. मध्यमर्वीय ग्राहक अधून-मधून हप्ता चुकवतात. तर श्रीमंत गटातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडवताना दिसतात. ई-रिक्षा घेणाऱ्यांकडून नियमित कर्जाचे हप्ते भरले जात असल्याचेही गडकरी म्हणाले. सरकारच्या प्रयत्नाने आता युवकांना कौशल्य विकासातून विविध क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहे. त्यांनी कौशल्याच्या जोरावर स्वत:चा उद्योग उभारून नोकरी मागणारे होण्याऐवजी नोकरी देणारे व्हावे, असेही ते म्हणाले.

आपल्या देशासमोर सर्वात मोठी समस्या रोजगाराची आहे. रोजगाराचा संबंध हा आपल्यातील गुणवत्तेशी आहे. आपल्यामध्ये कोणते स्किल आहे, की ज्याच्या आधारावर आपण रोजगार प्राप्त करू शकतो. अनेक कला आहेत, ज्या अनेक लोकांमध्ये आहेत, त्या कलांना विकसित करणे, प्रशिक्षित करणे आणि त्या पर्टिक्युलर कौशल्यामध्ये त्यांना एक्सपर्ट करणे खूप आवश्यक आहे.दरम्यान मेळाव्यात एकूण २३९ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी ग्यानतोष रॉय, (अप्पर सचिव, वित्तीय सेवा), विजय कांबळे (महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र), वैभव काळे (विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र) उपस्थित होते.