मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती देताना इंफाळ ईस्टचे पोलिस आयुक्त शिवकांत सिंह म्हणाले, खमेनलोक परिसरात भडकलेल्या हिंसेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. या हिंसाचारात मृत्यू झाला आहे त्यांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे.
मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या शरीरावर जखमा असून गोळ्यांच्या जखमा आहेत. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समाजामध्ये 3 मे रोजी हिंसाचार झाला होता. मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केल्यानंतर कुकी समाजाने काढलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतलं. या हिंसाचारात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार पसरवण्यात सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स गटातील अतिरेकी सहभागी होऊ शकतात, असा आरोप राज्य सरकारने केला आहे. दुसरीकडे, कुकी गटांकडून या हिंसाचारासाठी दोन कट्टरपंथी गट अरामबाई टेंगगोल आणि मेईतेई समुदायाच्या मीतेई लीपुन यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात ईशान्य समन्वय परिषदेचे अध्यक्ष आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. सरमा मणिपूरमधील ताज्या परिस्थितीबाबत शहा यांना अहवाल देतील.मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृहमंत्र्यांनी सरमा यांच्यावर मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पावलांची चौकट तयार करण्याचे काम सोपवले होते. सरमा 10 जून रोजी मणिपूरला गेले होते, जिथे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 115 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चाळीस हजारांपेक्षा अधिक लोक विस्थापीत झाले आहेत. मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायामध्ये गेल्या मे महिन्यात वाद झाला होता, तेव्हापासून या हिसांचाराला सुरुवात झाली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 115 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
