ठाकरे गटाच्या हक्काच्या जागेवर काँग्रेसचा दावा; मविआत पुन्हा बिघाडी?

सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि युतीमधील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तर काही पक्षांकडून आपल्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र्य बैठकांचं आयोजन केलं जात आहे. मात्र पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आात मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट नाराज होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष बघायला मिळू शकतो.

मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले होते. मात्र आता ते शिवसेना शिंदे गटात गेल्यानं या जागेवर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. नुकतीच जिल्हा काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मावळ आणि रायगड मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून एकमतानं ठराव करण्यात आला आहे. या ठरावानुसार मावळची जागा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी लढवावी असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी हे काँग्रेसचे राज्य प्रभारी एच के पाटील यांची देखील भेट घेणार आहेत.

दरम्यान, दुसरीकडे असाच वाद सध्या पुणे आणि शिरूर मतदासंघात देखील सुरू आहे. पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. ही जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. तर शिरूरमधून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे सूचक व्यक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे, मात्र तरी देखील या जागेवर राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी या जागेवर दावा सांगितला आहे.