राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी एसटीचे आधुनिकीकरण करून या लोकवाहिनीला सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार भरत गोगावले, ‘एसटी’चे सदिच्छादूत तथा अभिनेते मकरंद अनासपुरे, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, ‘एसटी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, एसटीचे अमृत महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष हा दुग्ध शर्करा योग आहे. एसटीचा 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास झाला असून ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. एसटी महामंडळाने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करावे. एसटीची सेवा गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख असली पाहिजे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना 50 टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, शासन हे लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे असावे, कायदा पण लोकांच्या हिताचा असावा. शासनाने मागील काळात लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. राज्यात मेट्रो प्रकल्प, रस्ते निर्मिती आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पर्याय शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी महामंडळाने पर्याप्त बसेसची व्यवस्था केलेली आहे. राज्यातील एसटी बस स्थानकांमध्ये काँक्रिटीकरण पूर्ण करून बसपोर्ट ही संकल्पना राबविण्यात यावी. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. एसटीच्या जमिनीचे मूल्यवर्धन करून त्यावर महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे.
प्रवासी हे एसटीसाठी सर्वस्व असल्याचे सांगत एकनाथ शिंदे म्हणाले, एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत. तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. एसटी बसेस, बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
