आम्ही कालही सोबत होतो; आज, उद्याही सोबत राहणार; जाहिरातीच्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

राज्यात शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून राजकारण चांगलेच तापलं आहे. भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलेच रणकंदन माजलं होत. दरम्यान, आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस एकत्र व्यासपीठावर दिसले आहेत. त्यामुळे या जाहिराती प्रकरणावर फडणवीस यांनी मौन बाळगल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे वेधले होते. मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात दोघांच्यात आलबेल असल्याचे स्पष्ट केलं.

आम्ही कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार, असे जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत बिनसल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. एका जाहिरातीमुळे काही होईल एवढी शिंदे गट व भाजपची युती तकलादू नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते.

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिंदे गट व भाजप यांच्यात जाहिरातीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज असून युतीत आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. अशात आज पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आमचा एकत्र प्रवास २५ वर्षांचा आहे. गेल्या वर्षभरात अधिक घट्ट आहे. आमच्या प्रवासाची चिंता कुणीच करण्याचं कारण नाही. कारण आम्ही सरकार खुर्च्या तोडण्यासाठी, पदं मिळवण्यासाठी तयार केलेलं नाही. सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी तयार केलंय. एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू हे सरकार नाहीये. हे जुनं सरकार नाहीये की कुणी आधी भाषण करायचं, कुणी नंतर यासाठी एकमेकांची गचांडी पकडणारे आम्ही बघितले असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.