शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.या सोहळ्याला स्थानिक आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आर/उत्तर विभागातील सखाराम तरे मार्ग महानगरपालिका शाळेची स्थापना सन १९५७ मध्ये झाली. या इमारतीमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती माध्यमाच्या शाळा असून सुमारे ४ हजार विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या सतत वाढत असल्याने, तसेच वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने या इमारतीच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला. आधीच्या इमारतीची रचना तळ मजला अधिक २ मजले अशी होती. पुनर्बांधणीनंतर इमारतीची रचना तळमजला अधिक ६ मजले प्रस्तावित करण्यात आली. दिनांक १४ मार्च २०२० रोजी या इमारतीची पुनर्बांधणी सुरू झाली होती.
दोन टप्प्यामध्ये या इमारतीची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये तळमजला अधिक सहा मजले इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमध्ये विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय, सभागृह, विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीत जुन्या इमारतीतील विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात येणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येईल.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे मागील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ‘मिशन अॅडमिशन’ या उपक्रमांतर्गत १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले. तसेच यंदाच्या २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ‘मिशन मेरीट’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दहिसर येथील मुंबई स्कूलच्या नवीन इमारतीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बसायला मिळणार असल्याने विद्यार्थी भारावले होते. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दीपक केसरकर यांनी शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
