गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. त्याच धर्तीवर पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट मैदानाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचे नाव देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ही मागणी धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांना केली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास शरद पवार यांच्या नावाने पुण्यात क्रिकेटचे स्टेडियम होऊ शकते. शरद पवार यांनी क्रिकेट विश्वात मोठी कामगिरी केली. याची पावती त्यांच्या नावाच्या रुपाने स्टेडियम होऊन मिळू शकते.
या मागणी संदर्भात धनंजय मुंडे यांनी एक पत्र लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेबांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. साहेबांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानास आदरणीय साहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला खासदार शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे. मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः मैदानात पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत.
