विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करेल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही; काँग्रेस नेत्याच्या ऑफरवर नितीन गडकरींच उत्तर

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षासंबंधी एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने आपल्याला त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती असा खुलासा त्यांनी केला आहे. पण त्यांनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता. काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन असं नितीन गडकरी यांनी त्या नेत्याला सांगितलं होतं. नितीन गडकरी यांनीच हा किस्सा सांगितला आहे.

गडकरी म्हणाले की, एका नेत्याने मला एकदा काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता, त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले होते की, मी त्या पक्षाचा सदस्य होण्याऐवजी विहिरीत उडी घेईन. काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या कामाच्या तुलनेत भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांत देशात दुप्पट काम केल्याचा दावा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी यावेळी केला.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भंडारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित केले. भाजपमधील त्यांचे सुरुवातीचे दिवस आणि पक्ष आता काय करत आहे, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर यांनी त्यांना एकदा दिलेला सल्लाही त्यांना आठवला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भंडाऱ्यातील भाषणादरम्यान काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत सांगितले. ते म्हणाले की, ” जिचकर मला एकदा म्हणाले की तुम्ही खूप चांगले नेते आणि कार्यकर्ते आहात. जर तुम्ही काँग्रेसमध्ये सामील व्हाल तर तुमचे भविष्य उज्ज्वल असेल. पण मी त्यांना म्हणालो की, काँग्रेसमध्ये सामील होण्याऐवजी विहिरीत उडी मारुन आत्महत्या करेल. कारण भाजप आणि त्यांच्या विचारधारेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भाजपसोबत काम सुरु ठेवणार आहे.”