भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन पदी बिनविरोध निवड

महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे भावा-बहिणीच्या जोडीची नेहमीच चर्चा असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या बहिण-भावामध्ये सातत्याने वादाच्या किंवा मतभेदांच्या बातम्या समोर येत असतात. अनेकदा जाहीर मंचावर हे बहीण भाऊ एकत्र आलेले दिसतात. पण एकाच मंचावरुन ते एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीकाही करताना दिसतात. तर कधी धनंजय मुंडे रुग्णालयात आजारी असताना बहीण पंकजाताई त्यांना फोन करुन तब्येतीची विचारसपूस करतात. एकीकडे टोकाचा राजकीय संघर्ष तर कधी मायेचा ओलावा, असं या भावंडांमधील नातं आहे.

नुकतंच काही दिवसापूर्वी जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. मात्र गोपीनाथ गडावर असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात दोन्ही बाजूने संघर्ष टाळण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं चित्र समोर आहे. बीडच्या राजकारणात पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येऊन वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ठरवली आहे. त्यामुळे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मुंडे बंधू-भगिनी एकत्र आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्यानंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड ही बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गटाचे चंद्रकात कराड यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे 11 संचालक तर धनंजय मुंडे यांच्या गटाचे 10 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. कारखान्याच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र आल्याची कबुली बहीण पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जवळपास अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली होती. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या.