खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. कॅनडातील गुरूद्वारा परिसरात दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हरदीप सिंग निज्जर याच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर निज्जरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.भारतीय एजन्सीच्या मोस्ट वॉन्टेड यादीत हरदीपसिंग निज्जरचा समावेश होता. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते, त्यानंतर त्याला वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते.
खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीपसिंग निज्जर कॅनडात बसून संघटना चालवत होता. सप्टेंबर 2020 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने हरदीप निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. यानंतर निज्जरची जालंधरच्या भरसिंग पुरा गावातील मालमत्ताही जप्त करण्यात आली. निज्जरने याच गावातील पुजाऱ्याची हत्या केली होती. याद्वारे तो पंजाबमध्ये धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करत होता. एनआयएने निज्जरवर १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हरदीपसिंग निज्जर हा गेल्या काही महिन्यांपासून भारतातून फरार झाला होता. तो कॅनडात असल्याची माहिती तपास यंत्रणांना होती. परंतु तो सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वारामध्ये प्रार्थना करत असतानाच दोन अज्ञात आरोपींनी गुरुद्वारात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी थेट गोळीबार करत हरदीपसिंग निज्जरची हत्या केली. हरदीपसिंग निज्जरच्या पोटावर, मानेवर आणि डोक्यात पाच ते सहा गोळ्या लागल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सरे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर हरदीपसिंग निज्जरचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
भारतीय एजन्सी सतत खलिस्तानी चळवळीवर काम करत असून, अलीकडेच वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल आणि त्याच्या सर्व समर्थकांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडा आणि इतर देशांतून काम करणाऱ्या खलिस्तान समर्थकांना मोठा धक्का बसला. अलीकडेच अमृतपालचा जवळचा सहकारी आणि खलिस्तान समर्थक अवतार सिंग खांडा याचाही रुग्णालयात मृत्यू झाला होता, खांडा यांचाही एनआयएच्या वॉन्टेड यादीत समावेश होता.
