राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एका नाण्याच्या दोन बाजू – शंभूराज देसाई

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते बाबत विधिमंडळ सचिवालय निर्णय घेईल. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी माजी राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नाही. नवीन राज्यपाल राज्यात आलेत. त्यामुळे केवळ स्टंटबाजी करणे ही नेहमीची पद्धत आहे. नेत्यांपर्यंत आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याचा दानवेंचा केविळवाणा प्रयत्न आहे, असा टोला देसाई यांनी लगावला.

शंभूराज देसाई म्हणाले, युवराजांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंना दोन विधान परिषदेची आमदारकी द्यावी लागली. एक सचिन अहिर आणि दुसरी सुनील शिंदे यांना. एका आमदाराला निवडून आणण्यासाठी दोन आमदारकी द्यावी लागली ही महारष्ट्रातील पहिलीच घटना आहे. केवळ युवराजांच्या प्रेमापोटी आहे. त्यामुळे आता कोण मोठा हे त्यांच्यात लागले. हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही केलेला उठाव हा स्वाभिमानासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी होता. जे संजय राऊत बोलतात, तेच उद्धव ठाकरेआणि आदित्य ठाकरे बोलतात. अजित पवार प्रॅक्टिकल बोलत असतात. ज्याला जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या असे पवार म्हणाले त्यामुळे आता ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणं बाकी आहे, अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

सर्व्हे वेगवेगळ्या संस्थांचे येतात. प्रत्येकाची पद्धती, कॅलक्युलेशन वेगळे असतात. मागच्या जाहिरातीच्या वादावर पडदा पडला आहे.शिवसेना-भाजप निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.2024 चा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातला निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील. त्यानंतर दिल्लीतील निर्णयानंतर पुढील गोष्टी होतील.2024 च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार-खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.