‘जे घडलं त्याचं उत्तर भविष्य देईल’ मनिषा कायंदेंच्या शिवसेना प्रवेशावर नीलम गोऱ्हेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला.शिवेसना ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या पक्षांतरावर एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. त्यावरही त्या बोलल्या आहेत. तसंच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकवला त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना नीलम गोऱ्हे यांनी एका वाक्यात उत्तर दिले. त्या म्हणाल्या, आजपर्यंत बऱ्याच वेळा शिवसेनेमध्ये चढ-उतार झालेले आहेत. अनेकांनी नवीन पक्ष काढले. अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. पण शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. राजकीय मतभेद हे अनेक पक्षांमध्ये होतात. काँग्रेसच्या देखील दोन काँग्रेस झाल्या होत्या. आत्ता जे घडलं त्याचं उत्तर भविष्य देईल जनता ठरवेल की कोणी योग्य वळणावर आहे. असे देखील त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. एकनाथ खडसे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संदर्भात पक्षाचे जे गटनेते असतात. ते निर्णय घेत असतात, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. पुढे त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीला दिलेल्या भेटीवर देखील भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांना औरंगजेबाच्या थडग्यावर जायची सवय आहे. ते पूर्वी सुध्दा बऱ्याच वेळेला गेले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.