निळवंडे धरणाच्या कामाचे पंतप्रधानांकडून कौतुक

निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पाच दशकानंतर पूर्ण होत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात या कामाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, नदी, नाले, कालवे केवळ जलस्त्रोत नसतात तर त्यांच्यात जीवनातील रंग आणि भावना जोडलेल्या असतात. अशाच प्रकारचे दृश्य काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात पाहायला मिळाले.पाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम आता पूर्ण होत आहे. चाचणीच्या वेळी कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यावेळीचे फोटो भावूक करणारे होते. होळी, दिवाळी असल्यासारखे गावातील लोक उत्साहित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणले होते. फडणवीस म्हणाले, या प्रकल्पात अनेक अडचणी होत्या. विखे पाटील हे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. हे काम करायचं ठरवलं तेव्हा विखे पाटलांशी चर्चा केली. पहिल्या २२ किमीचं काम झालं नाही तर हे काम पुढे जाईल कसं? आवश्यकता पडली तर मला फोर्स लावावं लागेल, असं मी त्यांना म्हणालो. परंतु, त्यांनी सूचना दिली की फोर्स लावायची आवश्यकता नाही. तुम्ही पिचडसाहेबांना विश्वास घ्या, पिचड साहेब निश्चित यातून मार्ग काढतील. त्यानंतर मंत्रालयात बैठक घेऊन पिचड साहेबांना विनंती केली. पहिल्या २२ किमीचं काम होणं गरजेचं आहे. २०१६ सालीच निर्णय घेतला की पाईपने हे काम पूर्ण करायचं. जेणेकरून शेतकऱ्यांना फोर्सने पाणी मिळते.