मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहिल्याने कोर्टाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी एका प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणातील सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून गुलाबराव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्यात सुनावणी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरु आहे. पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर होते. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. कोर्टाने 500 रुपयांचा दंड करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही दिली, अशी माहिती एकनाथ खडसे यांचे वकील भूषण देव यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील या बहुचर्चित खटल्याची पुढील सुनावणी 21 जून रोजी ठेवली आहे. युती सरकारमध्ये खडसे बारा खात्यांचे मंत्री असताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात एकनाथ खडसे यांनी 2016 मध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्याची आता नव्याने सुनावणी सुरू झाली आहे.
गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधातही आपण अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. आपल्याबाबत मंगेश चव्हाण यांनी अपशब्द वापरले, त्यामुळे जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे आपण आता मंगेश चव्हाण यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
