बाळासाहेबांच्या शत्रूंशी गळाभेट घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांना मांडीवर बसवलं, असा हल्लाबोल भाजपचे नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात ते पहा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी उद्धव ठाकरे यांनीच केली.
बाळासाहेबांचे जे आयुष्यभर शत्रू राहिले त्यांची गळाभेट करत स्वतःच्या मांडीवर उद्धव ठाकरेंनी त्यांना बसवलं. मोदींचे फोटो दाखवून त्यांचे लोक निवडून आले. नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन बसले. मतदारांशीही गद्दारी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते मतदारांपर्यंत गद्दारी हे स्वतः करणार आणि नंतर गद्दार दिन साजरा करा म्हणून युनोला पत्र लिहिणार. कदम म्हणाले, राजकीय पक्षांचे आपसातील वाद भांडणे आम्ही समजू शकतो. पण हे आपसातले वाद देशाच्या सीमेच्या आत पाहिजेत. तुम्ही यूनोला पत्र लिहून भारताला बदनाम करू पाहतात का? तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय मूर्ख समजता का? विडंबना ही आहे की स्वतः गद्दार असणाऱ्या लोकांनी इतरांकडे बोट दाखवून स्वतःची गद्दारी लपत नाही. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे लक्षात ठेवावे.
