ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणाची सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत सध्या जामिनावर बाहेर आहेत. अशातच आता याप्रकरणाची सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत कोर्टात हजर झाले होते. परंतु, गुरूआशिष या आरोपी बनवण्यात आलेल्या कंपनीच्या वतीने कोणीही कोर्टात हजर करण्यात आले नव्हते. यावरून मुंबई सत्र न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित गोरेगाव, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील खटला सध्या न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुरू आहे. यात ईडीनं आरोपींच्या यादीत आरोपी क्रमांक 4 बनवलेल्या गुरूआशिष या कंस्ट्रक्शन कंपनीची जबाबदारी अद्याप कुणीही घेण्यास तयार नसल्याचं चित्र कायम आहे. कंपनी बुडीत निघाल्याच्या प्रकरणाची सुनावणी सध्या लवादापुढे सुरू असून त्याचा निकाल प्रलंबित आहे. तसेच कंपनीच्या माजी संचालकांनी याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानं आपले हात आधीच वर केले आहेत. त्यामुळे सध्या ‘गुरूआशिष’ साठी कुणीच वाली न उरल्यानं आरोपनिश्चितीची प्रक्रिया अडकून पडली आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खटल्याच्या नियमित सुनावणीकरता मंगळवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, सहआरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर होते. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुरू असलेला हा खटला सध्या आरोपनिश्चितीच्या टप्प्यावर आहे. मात्र जोपर्यंत सर्व आरोपी कोर्टापुढे हजर होत नाहीत, तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे नेता येणार नाही. एनसीएलटीच्या भूमिकेची नोंद घेत तूर्तास मुंबई सत्र न्यायालयाने खटल्याची सुनावणी १४ जुलैपर्यंत तहकूब केली आहे.
