सोमवारी 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. बंडखोरीनंतर शिवसेनेचा हा पहिला वर्धापन होता. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातच ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी ठाकरेंनी मणिपूर हिंसाचारावरून मोदींवर सडकून टीका केली होती. त्यावरच भाजपकडून प्रत्युत्तर येत असताना आता बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अडीच वर्षं जो व्यक्ती आपल्या घरातच बंद राहिला, आपल्या कार्यकर्त्यांनाही भेटला नाही, जो कोविडच्या भीतीने आपल्या घरातून बाहेरच पडला नाही, त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचं काम त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं. जनतेनं केलं. त्यांनी आपली विचारसरणी सोडून अशा विचारसरणीला जवळ केलं तिला बाळासाहेब ठाकरे नेहमीच विरोध करत होते. त्यामुळे हा दिवस तर त्यांना बघायचाच होता. आता पश्चात्ताप करून काय फायदा?” असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
फक्त देशच नाही तर सगळं जग मान्य करतं की कोरोना काळात जगभरातील १६० देशांना भारताने औषधं पुरवली.भारतात २२० कोटी मोफत लस देण्याचं काम मोदी सरकारने केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून फंड देण्यात आला आणि वैज्ञानिकांना प्रेरित करण्यात आलं तेव्हाच लस तयार झाली.प्रत्येक घरात जाऊन लस देण्याचं काम मोदी सरकारने केलं. तुम्ही त्यावेळी घाबरून खोलीत बंद होतात. तुम्ही तर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरून गेला होतात, असा टोला देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लगावला.
