विरोधी पक्षात सुरु असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पदासाठी खुर्ची एक आणि चेहरे दहा आहेत असा टोला बावनकुळेंनी लगावला. विरोधकांची वज्रमुठ आता संपली असल्याचे ते म्हणाले. मोदी@9 अंतर्गत यवतमाळ येथे संपर्क ते समर्थन असा भाजपचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची बाबुळगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.2035 पर्यंत मोदींच्या नेतृत्त्वात भारत आत्मनिर्भर होईल असे यावेळी बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील देशाची सत्ता आणि सरकार सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे साधन झाले आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व मान्य नसल्याने महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला तडा पडला आहे. शरद पवारांनीदेखील त्यांच्या आत्मचरित्रातून ठाकरेंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले. महाविकास आघाडीमध्ये आठ लोक मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. यात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 3-3 तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.असेही बावनकुळे म्हणाले
अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे हे फक्त दोन वेळा मंत्रालयात आले. त्यावेळी त्यांनी आमदारांचे काम केले नाही. त्यामुळेच 50 आमदारांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांना साथ दिली असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावेळी बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जूनला गद्दार दिवस साजरा केला. पण 10 जून 1999 रोजी शरद पवार यांनी काँग्रेसशी गद्दारी करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवल्याचे बावनकुळे म्हणाले.
विरोधकांना पोराबाळांच्या भविष्याची काळजी
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत. मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आलेत. एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत. पण देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. 2019 सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं आता 2024 मध्येही जनता मोदीजींची साथ देणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
