पाटण्यात आज होत असलेली विरोधी पक्षांची बैठक ही परिवार वाचवण्यासाठी असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं या बैठकीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटंबाकडे सत्ता कशी राहू शकेल यासाठी हे विरोधक एकत्र आल्याचे फडणवीस म्हणाले. मेहबुबा मुफ्तीच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जात असल्याचेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, पाटण्यातील विरोधकांची आजची बैठक मोदी हटावसाठी नसून परिवार बचाव बैठक आहे. सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आल्या असून, या बैठकीचा मुख्य उद्देश आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याकडे कशी सत्ता राहू शकेल हाच या बैठकीमागचा मुख्य उद्देश आहे. एकत्रित आलेल्या सर्व पक्षांसाठी सत्तेत आल्यानंतर राज्य चालवणे म्हणजे धंदा असल्याचा थेट आरोपही फडणवीसांनी केला. तर, भाजपसाठी मोदींसाठी ही सेवा आहे. 2019 च्या निवडणुकांदरम्यानही ही सर्व मंडळी एकत्र आली होती. पण जनाता ही मोदीजींच्याच पाठिशी असून, 2019 पेक्षाही मोदी आणि एनडीएच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास यावेळी फडणवीसांनी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे विरोधकांनी अशाप्रकारे किती मेळावे घेतले तरी त्याचा काही परिणाम होईल.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. सातत्याने मेहबूबा मुफ्तीच्या नावावर भारतीय जनता पक्षाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तीसोबत तर चाललेच आहेत. आता तर ते त्यांच्या बाजूला बसलेत. सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता, सगळ्या प्रकारचे तडजोड करण्यासाठी हे तयार झाले आहेत, पण याचा परिणाम होईल, असं वाटत नाही,” अशा टीका त्यांनी ठाकरेंवर केली.
दरम्यान, पाटणा येथे आज भाजपविरोधात देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. देशभरातील जवळपास १५ भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. या बैठकीत लोकभा निवडणुकीसाठी विरोधकांच्याप्रमुख नेत्याच्या चेहऱ्यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
