मुंबई महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन

कॅग अहवालात आढळून आलेल्या मुंबई महापालिकेतील कामांच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी चौकशी समिती स्थापनेची घोषणा केली आहे.गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने सातत्याने केली होती.अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॅग अहवालातील अनियमिततेची चौकशी करा, अशी मागणी केली होती.

मुंबईत काही दिवसापासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी आणि काही राजकीय नेते ईडीच्या रडारवर आले आहेत. काही जणांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांना समन्सही बजावलेलं आहे. ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ईडीने ही कारवाई केल्याने ठाकरे गटाचे धाबे दणाणले आहेत. हे धाडसत्र चालू असतानाच महापालिकेतील कोट्यवधीच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

भाजप नेते, आमदार अमित साटम यांनी कॅगचा अहवाल आल्यानंतर महापालिकेतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. महापालिकेत 12 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप साटम यांनी केला होता. साटम यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. फणसाळकर यांच्या नेतृत्वात ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. फणसाळकर यांच्या नेतृत्वातील एक पथक महापालिकेतील या गैरव्यवहाराची चौकशी करणार आहे. कॅगचा अहवाल तपासून या व्यवहाराची चौकशी करणार आहेत.

ईडीच्या रडारवर कोण?

माजी महापौर ठाकरे गट नेत्या किशोरी पेडणेकर एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौर (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. याबाबत माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, किशोरी पेडणेकर यांना आतापर्यंत त्याचे नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलेले नाही.पुढे, मुंबई पोलिसांनी सांगितले की, एकूण नऊ जणांनी एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) मध्ये फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या, परंतु फ्लॅट मिळाले नाहीत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निकटवर्तीयालाही दादर पोलिसांनी अटक केली आहे.

सूरज चव्हाण हे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक, आदित्य ठाकरेंचे दौरे, सभा याच्या रणनितीमध्ये सूरज चव्हाण यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. अनेकदा ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत असतात.कोरोना काळात अनेक कंपन्यांना सूरज चव्हाण यांच्या मध्यस्थीने कोव्हिड सेंटरचं काम मिळाल्याचा, तसंच ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना सूरज चव्हाण यांनी काम मिळवून दिल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.याचा तपास ईडी करत आहे.

सुजित पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.लाईफ सायन्सेस हॉस्पिटल आणि मॅनेजमेंट फर्ममधील पाटकर हे भागीदार आहेत. या फर्मला कोव्हिड सेंटरचं कंत्राट मिळालं होतं. यावेळी अनेक अटीशर्तींचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. त्यामुळे एसआयटीच्या रडारवर कोण येणार? असा सवाल केला जात आहे. एसआयटीच्या रडारवर महापालिकेचे अधिकारी येणार की राजकारणी येणार? असा सवाल करण्यात येत आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील व्यवहारांची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याने ठाकरे गटाचे धाबे दणाणले असल्याचं सांगितलं जात आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार हा ठाकरे गटासाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकतो, असंही सांगितलं जात आहे.