राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जुन्या दमाचे पाहिजे असतील तर मी आहे; छगन भुजबळांचं वक्तव्य

शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदावर देखील नेत्यांकडून दावा सांगितला जात आहे. काही दिवसाआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेतेपद नको, मला पक्षात कोणतही पद द्या अशी इच्छा व्यक्त केली होती.त्यानंतर अजित पवार यांनी प्रदेशाध्यपदावर दावा केल्याचे बोललं जात होतं. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांचा दाखला देत राष्ट्रवादीने देखील ओबीसींना प्रदेशाध्यपद द्यावे असे छगन भुजबळ म्हणाले आहे

भुजबळ म्हणाले, पक्षाला ओबीसी नेता मिळाला तर पक्ष आणखी मजबूत होण्यास मदत होईल. यामुळे ओबीसी समाज मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडला जाऊ शकतो. राष्ट्रवादीत तटकरे, मुंडे, आव्हाड आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते किंवा मलाही जबाबदारी दिली तर मीही काम करेन असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत पद देण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला होता.आज मात्र, त्यांनी आपल्या या वक्तव्यापासून यू टर्न घेतल्याचे दिसून आले.राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसमावेशक हा पक्ष आहे इतकंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही. माझं स्वतः च काय. लोकांनी सांगितलं भुजबळांना प्रदेशाध्यक्ष व्हायचंय पण, मला व्हायचं नाही. भुजबळांना हे पाहिजे आहे की आपल्या पार्टीची इमेज बदलली गेली पाहिजे. सगळ्यांना घेऊन चालतो आहोत अशी इमेज तयार झाली पाहिजे जी आज आपल्याला त्रासदायक ठरत आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी काल केलेल्या वक्तव्यावर दिले.

देशात अजूनही समाजा समाजाचं राजकारण चालत आहे. दोन महत्वाची पदं विधिमंडळातला प्रमुख नेता आणि दुसरा पक्षाचा अध्यक्ष. विधिमंडळ पक्षाचा नेता हा पुढे उपमुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो. ही जी दोन पदं आहेत ती वेगवेगळ्या समाजाला देण्याची पद्धती आहे. राजकीय सोयीसाठी तसेच सर्व समाज एकत्रित रहावे यासाठी.आजही मला असं वाटतं की काल अजितदादांनी सांगितले दुसऱ्या राज्यातील प्रादेशिक पक्ष स्वतःच्या ताकदीवर निवडून येतात. पण, शरद पवार यांच्यासारखा राष्ट्रीय पातळीवर नेता असतानाही आपण राज्यात स्वबळावर येऊ शकलो नाही. पक्षाचा मुख्यमंत्री करू शकलो नाही. कारण, यात आहे की आजही ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये आहे, शिवसेनेत आहे. काँग्रेसमध्येही आहेतच. या सगळ्या समाजाला बरोबर घेतल तरच आपण पुढे जाऊ शकतो. मग मी पण म्हणणं मांडलं. आमच्या पक्षात खूप लोक आहेत. आव्हाड, मुंडे आहेत. मध्यम दमाचे पाहिजे असतील तर तटकरे आहेत. जुन्या दमाचे पाहिजे असतील तर भुजबळ आहेत. याव्यतिरिक्त आणखीही लोक पक्षात आहेत. ओबीसीचा नाही तर दुसऱ्या समाजाचा घ्या हरकत नाही, असे भुजबळ म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळेंना तर तिकीट सुद्धा नाकारलं होतं. पण त्याच बावनकुळेंना भाजपने पुढं पक्षाचा प्रांताध्यक्ष केलं. काँग्रेसने नाना पटोले यांना अध्यक्ष केलं. पुढे मात्र दोन्ही पदं एकाकडेच ठेवायचं काम झालं. ही काय परंपरा सुरू झाली. मी तर पक्षाचा विरोधी पक्षनेता म्हणून विधान परिषदेत काम करत होतो. शिवसेना भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरोधात लढलो. पवार साहेबांनी आणि आम्ही मिळून राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला. पुढे तीन महिन्यातच निवडणुका लागल्या. पुढे मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बबनराव पाचपुते यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. पुढे हळूहळू हे सगळं बदलत गेलं.