उद्धव जी बाळासाहेबांचा हा व्हीडीओ पाहा, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कशी दिलीय ते समजेल – चित्रा वाघ

बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे नेते उपस्थित झाले आहे. यावरुन ठाकरे गटातील नेत्यांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येते आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याव्यतिरिक्त राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन व अन्य नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत.

भाजप नेत्या चित्र वाघ यांनी याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धवजी बाळासाहेबांचा हा व्हीडीओ पाहा… यात बाळासाहेबांनी लालू प्रसाद यादवला काय म्हटलं होतं ते ऐका. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कशी दिलीय ते समजेल… बाळासाहेबांच्या भाषेत “तोंडात चारा भरलेला, म्हशीजवळ लोळणारा लालू..” बाळासाहेबांनी लालूला नालायक म्हटलं होतं… आता अशा नालायका समोर लोटांगण घालण्याची वेळ तुमच्यावर आलीय. देवेंद्र फडणवीस उगाच नाही म्हणाले तुम्हाला…खरंच काय होतास तू काय झालास तू, असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीवरून उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नेम साधला आहे. ‘विरोधकांची मोदी हटाव बैठक नव्हे तर कुटुंब बचाव बैठक आहे, अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली.