छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण संहिता निर्माण करू शिक्षण व शिक्षक कसा असावा याचा उत्तम आदर्श समाजापुढे निर्माण केला. त्यामुळे सामाजिक क्रांतीत छत्रपती शाहू महाराजांचे योगदान अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी येथे केले. सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना केदार या बोलत होत्या. सामाजिक न्याय दिनानिमित्त समाज कल्याण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. त्या निमित्त संविधान दिंडी, छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्ररथ व नशा मुक्ती पंधरवडा निमित्त जनजागृती पर कार्यक्रम यासह विविध बाबींच्या माध्यमातून सामाजिक न्यायदिन थाटात साजरा करण्यात आला.
समाज कल्याण विभागाकडून आज सकाळी समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाच्या उपायुक्त जया राऊत यांनी रॉलीला हिरवी झेंडी दाखवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान संविधानाची जनजागृती करणारा संविधान रथ, छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्ररथ तसेच नशा मुक्ती पंधरवड्याची प्रभावी जनजागृती करणारे फलक या रॅलीमध्ये लक्ष वेधून घेत होते. सामाजिक न्याय भावनात या रॅलीचा समारोप करण्यात आला.
सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भावनात झालेल्या मुख्य कार्यक्रमादरम्यान सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात होणारी त्याची प्रभावी अंमलबजावणी सुद्धा यावेळी सांगितली. कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, महापुरुषांचे जीवन चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी. चांगला समाज आणि चांगला माणूस घडवायचा असेल तर छत्रपती शाहू महाराजांचे जीवन हे सर्वांसाठी दीपस्तंभ सारखे आहे असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून डॉ.मनीष गवई यांनी संबोधित केले. इतर मागास बहुजन कल्याणचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे, जया राऊत, डॉ. दिनेश मेटकर, उत्तमराव भैसने, राजाभाऊ गडलिंग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय दिनानिमित्त संपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
जमिनीचे पट्टे, मिनी ट्रॅक्टरचे वितरण
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत कार्यक्रमादरम्यान सात लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे हस्तांतरित करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात जात वैधता प्रमाणपत्र अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने योजनेअंतर्गत नऊ मिनिट ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार राजेश गरुड यांनी मानले.
