युवराजांनी बाबुरावची जागा घेतली…युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? – आशिष शेलार

मोसमातील पहिल्याच पावसात मुंबईतील शहरातील काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले. यामुद्द्यावर उद्धव ठाकरे गट आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काल गटरी तुंबल्या आणि रस्त्यांवर पाणी साचल्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनास लक्ष केले. तसेच नालेसफाई झाली नसल्याचा आरोप देकील केला. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या आरोपांनंतर भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रमुख नाल्यांची सफाईची पाहणी केली होती.यंदा रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच कुठलेही मुंबईकरांना त्रास देखील होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण त्याचे हे आश्वासन फोल ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.यावर ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती. त्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. शेलारांनी टि्वट करीत आदित्य ठाकरेंनी रविवारी दिलेली माहिती कशी चुकीची आहे, हे सांगितलं आहे.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार एड. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. मातोश्रीच्या युवराजांनी, आपल्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले, असा दावा केला आहे. पण मुंबईत एका तासात 400 मिमी एवढा पाऊस कधी पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005 ला सुद्धा एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता, असे सांगत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

“तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली.” “म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात 400 mm? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005 ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता. यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर!”

मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना… इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी, असा टोलाही आमदार शेलार यांनी लगावला आहे.