तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी शनिवारी इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले. त्यांनी रविवारी हेलिओपोलिस वॉर मेमोरियल आणि अल हकीम मशिदीला भेट दिली. पंतप्रधानांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे.या दौऱ्यादरम्यान इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कैरो येथे ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्काराने सन्मानित केले, ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी दिली. त्यांनी म्हटलं की, ‘हा इजिप्तचा सर्वोच्च राजकीय पुरस्कार आहे.’ पंतप्रधान मोदी यांच्या इजिप्तच्या दौऱ्यामुळे इजिप्तच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मूळचे भारतीय असलेले बोहरा मुस्लिम समाजाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबावाला यांनी म्हटलं की, ‘आजचा दिवस आमच्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे कारण पंतप्रधान मोदी यांनी अल – हकीम या मशीदीला भेट देऊन आमच्यासोबत संवाद साधला.’
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इजिप्त दौरा अतिशय खास आहे. सप्टेंबर महिन्यात भारत G20 देशांचे यजमानपद भूषवणार आहे. यानिमित्ताने इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल अल सिसीही भारतात येणार आहेत. इजिप्त हा G20 चा भाग नसून भारताच्या विशेष निमंत्रणावरुन जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या बैठकीत सहभागी होणार आहे.
गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा 13 वा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.सर्वप्रथम, सौदी अरेबियाला 2016 मध्ये ऑर्डर ऑफ अब्दुलअजीझ अल-सौद प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांना गैर-मुस्लिम म्हणून हा सर्वोत्तम सन्मान मिळाला आहे. याशिवाय, पॅलेस्टाईनला ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार देण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांच्या काळात मिळालेले सर्वोच्च सन्मान
● मे 2023 – कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, पापुआ न्यू गिनी या देशाने प्रदान केलेला सर्वेच्च नागरी पुरस्कार
● मे 2023 – कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी , पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक नेतृत्वाची ओळख म्हणून फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान.
● मे 2023 – पलाऊ देशाकडून देण्यात आलेला इकबाल पुरस्कार.
● डिसेंबर 2021 – ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो, भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
● 2020 – लीजन ऑफ मेरिट, अमेरिकेच्या सशस्त्र दलाने दिलेला पुरस्कार.
● 2019 – किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाँ, आखाती देशाचा सर्वोच्च सन्मान.
● 2019 – ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन, मालदिवकडून परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान.
● 2019 – ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान.
● 2019 – ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार, संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी सन्मान.
● 2019 – ग्लोबल गोलकीपर पुरस्कार, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून स्वच्छ भारत अभियानासाठी करण्यात आलेला सन्मान.
● 2018 – ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार, पॅलेस्टाईनकडून परदेशा मान्यवरांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान.
● 2016 – स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान , अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
● 2016 – ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद, सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान.
