रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी पुन्हा शिर्डीत येणार आहे. 2009 मध्ये मी शिर्डीतून निवडणूक लढवली होती. संधी मिळाली तर मी पुन्हा शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवेल. कारण माझा शिर्डीच्या जनतेवर विश्वास आहे. इथली जनता मला स्वीकारेल असं आठवले यांनी म्हटलं आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिर्डीचा सर्वांगीण विकास करायचा आहे असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.
जुने झाले गेले आता आमचे जमतेय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे रिपब्लिकन पार्टीचे शिर्डीतील लोकसभेचे उमेदवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मदत करून विजय करतील असे मत काही दिवसापूर्वी रिपाईचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी व्यक्त केले आहे
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या मांडीला मांडी लावली असती आणी मला बाजूला उभं केलं असतं तर एव्हढे आमदार फुटले नसते, त्यांच्यावर गंभीर परिस्थिती ओढावली नसती. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यामुळे त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,असा घणाघात आठवले यांनी केला आहे.आठवले यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात दिव्यांगांना विविध वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाणं उद्धव ठाकरेंचा नाईलाज होता. त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर गेले आहेत असं आठवले यांनी म्हटलं आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज पंढरपुरात शक्तिप्रदर्शन केलं. याबाबत आठवले यांना विचारलं असता, के. चंद्रशेखर राव यांचे बरेच बोर्ड महाराष्ट्रात दिसत आहेत. मात्र अशी नवी पार्टी महाराष्ट्रात येऊन काही फरक पडणार नाही. त्यांना फारशी मतं मिळणार नाहीत. नवीन पक्ष आला की इकडचे तिकडचे लोक पक्षात जातच असतात. त्यामुळे महाराष्ट्रात काही फार फरक पडणार नाही असं आठवले यांनी म्हटलं आहे.
