महाराष्ट्राचं आमचं आम्ही बघू तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला आहे. तो पक्ष सांभाळावा. राज्य सांभाळावं. तेलंगणामधील लोकांना सुविधा पुरवाव्यात. महाराष्ट्रासाठी काम करायला आम्ही समर्थ आहोत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना फटकारलं आहे. केसीआर यांची पंढरपूरमध्ये सभा झाली. या सभेत केसीआर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
केसीआर यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेविषयी विचारले असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, के. चंद्रशेखर राव यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळावा. दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला ना, तो त्यांनी सांभाळावा…. त्यांचं राज्य नीट सांभाळावं. त्यांच्या राज्यातल्या लोकांना सुविधा द्याव्यात. महाराष्ट्रातील सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहे. गेल्या ११ महिन्यांत महाराष्ट्र सरकारने जनतेला सुविधा दिल्या आहे. सर्व घटकांसाठी कार्य केले. त्यामुळेच त्यांच्या त्यांच्या दौऱ्याची दखल घेण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनीही केसीआर यांच्या सोलापुरातील केलेल्या शक्तीप्रदर्शनावरही भाष्य केलं. महाराष्ट्रात काय शक्तीप्रदर्शन करणार? इथली जनता महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी आहे. केसीआर यांनी आपलं शक्तीप्रदर्शन तिकडे तेलंगणात दाखवायला करायला हवं. आपली ताकत तेलंगणात दाखवायला हवी, अशी टीका केली.
दरम्यान, केसीआर यांना भाजपाची बी टीम म्हणणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे. “विरोधक आधी तर त्यांचं स्वागत करत होते. त्यांना आमंत्रण देऊन जेवू घालत होते. आता कसे ते बी टीम झाले? ही दुटप्पी भूमिका आहे. केसीआर येवो वा इतर कुणीही येवो. महाराष्ट्रातली जनता समजूतदार आहे. काम करणाऱ्या सरकारच्या पाठिशी ती ठाम आहे”, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.
